खेड : तालुक्यातील ऐतिहासिक जामगे गावात श्री कोटेश्वरी मानाई देवस्थान येथे क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन शनिवार दि. ८ व ९ रोजी झाले. संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, गोवा येथील कदम कुळातील बांधव उपस्थित होते.
कुल संमेलनाचा आरंभ तुळजापूर येथील गोंधळी यांनी दि.८ रोजी सायंकाळी ७ वाजता गोंधळ सादर केला. दि.९ रोजी सकाळी ९.३० वाजता कदंब राज घराण्याच्या ध्वज गृह राज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्याहस्ते अरोहित करण्यात आला. यावेळी कदम कुळातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरराजे कदम यांनी केले. ते म्हणाले, यापूर्वीचे राज्य स्तरीय संमेलन तुळजापूर, नांदेड, पंढरपूर, गिरवी-फलटण आणि देवगड येथे सहा यशस्वी कुलसंमेलन झाली आहेत. यंदाच्या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजातील बंधू-भगिनींमध्ये एकता, संवाद आणि सहकार्य वाढविणे हा प्रमुख उद्देश होता. तर समाजातील बांधवांना नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. यावेळी ना. कदम म्हणाले, कदम समाजाने एकत्र येण्याची गरज असून, संघटित समाजच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो. मुंबईतील पटेल समाजाचे उदाहरण देत, एकजूट आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज उन्नती करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “स्वतःसाठी जगलात तो फक्त जगला, पण दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला!” आपण किती प्रगती केली हे महत्त्वाचे नाही, तर आपण किती लोकांना सक्षम करून उभे केले हे जास्त महत्त्वाचे आहे. कदम बांधवांनी एकत्र येऊन सहकार्याची भावना जपावी आणि सामूहिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुढील आठवे राज्यस्तरीय कुलसंमेलन नाशिक, निफाड येथे आयोजित केल्याची घोषणा केली. संमेलनाच्या आयोजनात माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, क्षत्रियमराठा कदम परिवार राज्य सचिव श्री. रामजी कदम तसेच कार्यकारीणी सदस्य श्री. गणेश कदम, रामभाऊ कदम, विलास कदम, लक्ष्मण कदम, एकनाथ निकम, रामजी कदम आदींनी पुढाकार घेतला होता. महाराष्ट्रभरातील कदम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून हा सोहळा यशस्वी केला. समाजाच्या प्रगतीसाठी असे संमेलन महत्त्वाचे असून, भविष्यातील कुलसंमेलनांना आणखी मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रा. डॉ.सतीश कदम, उद्योजक मनोज कदम यांचे व्याख्यान झाले. निफाड चे माजी आमदार अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सन १९७८ मधील महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन रामजी कदम यांनी केले.