चिपळूण – काल रात्री वालोपे पायरवाडी येथील डोंगर भागामध्ये अज्ञाताने वणवा लावला यामुळे उबाठाचे क्षेत्रप्रमुख माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी वणवा लावणाऱ्या अज्ञाताविरोधात तीव्र भाषेत संताप व्यक्त केला. तर वणव्याचे वृत्त कळताच विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी रात्रीच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वणवा नष्ट केला. यावेळी शिवसेनेचे निहार कोवळे आणि त्यांचे सहकारीही मदतीसाठी उपस्थित होते.
रात्री उशीरा या भागात वणवा दिसल्यानंतर या संदर्भात बाळा कदम यांनी तात्काळ वनविभागाचे परिक्षेत्रीय वनाधिकारी खान यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला. विभागीय वनाधिकारी देसाई यांना हे वृत्त समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी आणि सेनेचे कार्यकर्ते यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या संदर्भात बोलताना बाळा कदम यांनी सांगितले, कोणीतरी जाणीव पूर्वक हा वणवा लावलेला आहे. या वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे नुकसान होतेच होतेच परंतु जंगलातील प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे जळून जातात ते व त्यांची भावी पिढी नष्ट होते. असे सांगून वणवा लावणाऱ्यांना माझा शाप आहे की याच पद्धतीने त्यांचे कुटुंब व त्यांची पिढी नष्ट होईल. असेही संतप्तपणे म्हटले. वणवा नष्ट करण्यासाठी मध्यरात्रीच घटनास्थळी आल्याबद्दल डीएफओ देसाई यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले तर निहार कोवळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.