डेहराडून, मुंबई, पुणे, सोलापूरमध्ये दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील मूळचा रहिवाशी असलेल्या परंतु मुंबई डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या तरुण, तडफदार मुलाने दिग्दर्शनात दमदार एन्ट्री केली आहे. वृशांक तुषार कवठेकर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने मुंबई, पुणे, सोलापूर, डेहराडून सारख्या मोठ्या शहरात आपल्या नाटकांची चुणूक दाखवून दिग्दर्शनात विविध पुरस्कार मिळवले आहे.
वृशांकचा जन्म भिवंडी येथे झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीमधील वाटद खंडाळा येथील आहे. त्याचे सर्व बालपण डोंबिवलीमध्ये गेले. प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेत झाले. त्यानंतर त्याने महाविद्यालयीन शिक्षण, मॉडेल महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांचे वडील तुषार हे शासकीय कर्मचारी असून, आई ऋचा गृहिणी आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या वृशांकने, आतापर्यंत ५० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. कवठेकर घराण्यात सर्वांनाच कलेची आवड आहे. त्यामुळे वृशांकने जेव्हा दिग्दर्शनाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला त्यांच्या आईवडिलांनी पाठिंबाच दिला. वृशांकने शाळेत असताना एका नाटकात सहभाग घेतला होता. हे नाटक दिपाली काळे यांनी बसविले होते. त्याने २०१३ साली नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. ‘देवरुखे ब्राह्मण संघ’ डोंबिवलीच्या एकांकिका स्पर्धेत त्याने, पहिल्यांदाच बाल एकांकिका दिग्दर्शित केली आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातूनच आपण रसिकांना एक चांगली कलाकृती बघण्याचा आनंद देऊ शकतो, याची दिशा वृशांकला मिळाली. त्यानंतर त्याचा नाट्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्याच्या नाटकांना एका मागून एक पारितोषिक मिळत गेले. नाट्य दिग्दर्शनाचा प्रवास सुरू असतानाच, त्याला गुरूकुल द डे स्कूल या शाळेत नाट्य प्रशिक्षक आणि कलासंचालक म्हणून नोकरी मिळाली. कला क्षेत्रात काम करताना, कायमस्वरूपी वेतन मिळणारी नोकरी सांभाळूनच दिग्दर्शनाची आवड जोपासायची असा निश्चय वृशांकने केला होता. २०१६ साली गुरूकुल द डे स्कूलमध्ये तो रुजू झाला. कलेच्या क्षेत्रातच नोकरी मिळाल्याने, नोकरी आणि आवड या दोन्ही गोष्टी वृशांकला जोपासता येत आहेत.
वृशांकला २०१४ साली देहराडून येथे झालेल्या १२व्या भारत संस्कृती दर्पण नाट्य महोत्सव, देहराडून या राष्ट्रीय महोत्सवामध्ये ‘मॉडर्न रामायण’ या बालनाट्यास ‘सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटिका पुरस्कार’ मिळाला. २०१५ साली प्रथमच, बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक त्याला मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मुंबईतर्फे सोलापूर येथे आयोजित पहिल्या बालनाट्य संमेलनात, ज्येष्ठ लेखक योगेश सोमण लिखित ‘झेप’ हे बालनाट्य सादर करण्याची संधी त्याला मिळाली. दरवर्षीच्या डोंबिवली जिमखाना आयोजित सांस्कृतिक महोत्सवात, आंतरशालेय स्पर्धेत सादर केलेल्या एकपात्री प्रयोगांना आजपर्यंत अनेक पारितोषिके ही मिळाली. थिएटर मुव्हमेंट, ओडिशा आयोजित केलेल्या राष्ट्रीय महोत्सवामध्ये दिग्पाल लांजेकर लिखित ‘आरंभ’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच वृशांकाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
वृशांकला विविध ठिकाणी परीक्षक, प्रमुख पाहुणा आणि नाट्य प्रशिक्षक म्हणून निमंत्रित केले जाते. वृशांकला आतापर्यंत ‘श्रीकला संस्कार’ संस्थेतर्फे दिला जाणारा ‘कलाश्री पुरस्कार’, देवरुखे ब्राह्मण संघ आयोजित दर्शन निमकर स्मृती एकांकिका स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट रंगकर्मी पुरस्कार’, बालोत्सव २०१७ साली ज्येष्ठ रंगकर्मी अनंत वेलणकर स्मृती बालनाट्य क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार आणि २०२०-२१ सालचा ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. कला क्षेत्रातील उगवत्या दिग्दर्शकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!