शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बॉटलमध्ये काढले रक्त, बोरूने उमटवली अक्षरे
सांगली : सांगली मार्गावर शक्तीपीठ महामार्ग नकोच त्यापेक्षा रत्नागिरी नागपूर महामार्गाला शक्तीपीठ देवस्थाने जोडा अशी मागणी करत ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करा’, या मागणीसाठी सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत.
बाधित शेतकरी सोमवारी सांगलीवाडीतील राममंदिर चौकात एकत्रित जमले होते. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत संकलीत केले व बोरूने, ‘माझी जमीन बागायती असून, महामार्गासाठी द्यायची नाही, तसेच या महामर्गामुळे या परिसराला महापुराचा धोका वाढणार आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे ‘सर्व देवस्थाने रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावीत,’ अशा आशयाची पत्रे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत.
नांदेड येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे म्हंटले होते. यावर येथील नागरिकांनी ‘शक्तिपीठ’ला विरोध असल्याचा पुरावा म्हणून आपल्या रक्ताने पत्र लिहिले.
यावेळी शेतकरी म्हणाले, सांगलीचे आमदार-खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतात, ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का, असे संतप्त प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. याकरिता पोस्ट कार्ड लिहिण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्ट कार्ड लिहिली. यामध्ये माजी आमदार दिनकर पाटील, उमेश देशमुख, महेश खराडे, हरिदास पाटील, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.