५ वर्षे अडकलेय वाळूत
रत्नागिरी : ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात मिऱ्या बंदर येथे अडकलेल्या बसरा स्टार जहाजाला बाहेर काढण्याचा अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 5 वर्षानंतर हे जहाज बाहेर काढले जाणार आहे. येत्या १५ दिवसात सर्व परवानग्या घेऊन हे जहाज काढले जाणार आहे.
सुमारे ३५ कोटीचे हे जहाज अवघ्या २ कोटीमध्ये भंगारात काढावे लागणार आहे. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे यासंदर्भात कस्टम, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर २ महिन्याच्या आत ते जहाज कापून बाहेर काढले जाईल. त्यामुळे यंदाचा पावसापुर्वी रखडलेले मिऱ्या बंधाऱ्याचे सुमारे दोनशे मीटरचे काम करता येणार आहे. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्य रखडलेल्या कामामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.