महात्मा गांधींजी यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन
सावर्डे/संदीप घाग- विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या कार्याची, जीवन मूल्यांची माहिती व्हावी.वाचन संस्कृती विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण व्हावी, पुस्तके वाचण्याची गोडी लागावी व मोबाईलच्या दुनियेत हरवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा वाचनाकडे वळावा कारण वाचनानेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास शक्य आहे ही बाब लक्षात घेऊन सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजींचे जीवन चरित्र, बालपण, शिक्षण, स्वातंत्रसंग्रामातील त्यांचा सहभाग व शिक्षण विषयक मूल्यांची माहिती देणारी पुस्तके,कथा अशा प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनासाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना नियोजनाप्रमाणे ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची माहिती घेतली. पुस्तक प्रदर्शन दोन दिवस सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे साठी खुले ठेवण्यात आले होते.विद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महात्मा गांधीजी विषयी पुस्तकांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मानसिक व भावनिक विकासासाठी पुस्तकांचे प्रदर्शन उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी पुस्तकांची वाचन नियमित करावे व उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी विद्यार्थ्यांना केले. सदर पुस्तक प्रदर्शन ग्रंथपाल समृद्धी कदम यांनी प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते विद्यालयातील शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.