कणकवली:-मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-उभादेव नजिक पंढरपूरवरून मालवणच्या दिशेने जाणार्या टाटा अल्ट्रास कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावरून गोवा-मुंबई लेनवर जावून पलटी झाली.
दरम्यान त्याचवेळी गोवा-मुंबई या लेनवरून येणार्या इनोव्हा कार चालकाने आपल्या ताब्यातील कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोही भरधाव असल्याने ती ही कार दुभाजकावर धडकून विरुद्ध दिशेला म्हणजेच मुंबई-गोवा लेनवर जावून थांबली. या अपघातात मालवणकडे जाणार्या कारमधील चौघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी 1 वा. च्या सुमारास घडला. या अपघातात टाटा अल्ट्रास कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
पंढरपूर दर्शन करून मालवणमधील तांडेल कुटुंबिय टाटा अल्ट्रास कारमधून मालवणकडे निघाले होते. वागदे-उभादेव नजीक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावरून गोवा-मुंबई लेनवर जाऊन उलटी झाली. या कारमधील किरण चंद्रकांत आचरेकर (वय 39), कृष्णनाथ भगवान तांडेल (70), सत्यवान भाऊ आंबेरकर (77), नागेश संभाजी परब (66, सर्व रा. सर्जेकोट) हे जखमी झाले. यातील सत्यवान आंबेरकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तर इनोव्हा कारमधील आनंद देविदास येलकर (30, रा. कल्याण-ठाणे) हे इन्होवा कारने प्रवास करत होते. कारला अपघात झाल्याचे पाहताच त्यांना त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी झालेल्या अपघातग्रस्तांनाही खासगी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोन्ही वाहनांना अपघात झाला त्यावेळी अन्य वाहने नसल्याने मोठे दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस आर. के. पाटील, सुभाष शिवगण, विनोद सुफल, किरण कदम तसेच वाहतूक पोलिस दाखल झाले होते. मात्र या अपघाताची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात नव्हती.