चिपळूण : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी येत्या पावसाळ्यात किमान 500 झाडांची लागवड करावी. झाडे जगवण्यासाठी गावस्तरावर प्रयत्न करावेत. केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये. यात अनेक अडचणी येतील.
मात्र, त्यावर मार्ग काढून पुढे जाण्याची भूमिका सर्वानी स्विकारायला हवी. सर्वाधिक झाडे लावून त्यांचे जतन करणार्या ग्रामपंचायतींना सन्मान केला जाईल, असे आवाहन आ. शेखर निकम यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना टंचाई आराखडा बैठकीत केले.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईकृती आराखडा बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्यांनी पाणीटंचाई विषयाची माहिती दिली. पाणी योजनांच्या कामात विहिरी, साठवण टाकी, बोअरवेल आदीसाठी लोकांच्या मोफत जमिनी घेताना येणार्या समस्यांची माहिती दिली. त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. ज्या गावात पाण्याची अडचण आहे. विहिरी, बोअरवेलची आवश्यकता आहे, अशा ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव पंचायत समितीत द्यावेत. गतवर्षी काही ग्रामपंचायतींनी परिपूर्ण प्रस्ताव दिले नाहीत, परिणामी त्यांची कामे मंजूर झाली नसल्याचे आमदारांनी सांगितले.
या बैठकीनिमित्त आ. निकम यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीसमोर वृक्ष लागवडीचा विधायक उपक्रम मांडला. ते म्हणाले की, येत्या पावसाळ्यात सर्व ग्रामपंचायतींनी किमान 500 झाडे लावण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आतापासूनच तयारी करावी. मोकाट गुरांमुळे अनेक समस्या निर्माण होतात, असे काही सरपंचानी नमूद केले. त्यावर आमदार निकम म्हणाले, योग्यरित्या वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्यासाठी अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करून पुढे जाण्याची भूमिका स्वीकारायला हवी. गुरांपासून रोपांचे संगोपान होण्यासाठी बांबूपासून ट्री गार्ड तयार करावे, हे काम कमी खर्चात होईल. एखाद्याच्या वाढदिवसानिमीत्त 5 ते 10 ट्री गार्ड भेट स्वरुपात घ्यावेत.
पावसाळ्यात लागवड होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. याकामी संस्था, मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सामावून घ्यावी. जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करावे. वृक्ष लागवडीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. हे श्री सदस्य नियमीतपणे झाडे लावून त्यांची जोपासन करत आहेत. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता प्रतीक झिंगे, शाखा अभियंता दीपक गवस, महावितरणचे पाटणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे रवींद्र जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
उपक्रम फोटोसेशनपुरता नसावा
वृक्ष लागवडीसाठी देशी रोपांची निवड करावी. अनेक गावात शासकीय जागा पडीक आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेत रोपांची लागवड करावी. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम केवळ फोटोसेशन पुरता मर्यादित राहू नये. गतवर्षी लावलेली झाडे किती जगली, याचाही मागोवा घ्यावा.