खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील एका गावातील तरूणीस ब्लॅकमेल करत शिवीगाळीसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताच्या खेड पोलिसांच्या पथकाने सातारा येथे मुसक्या आवळल्या. महेंद्रकुमार दुज्जी भारतीच्या (31 रा. प्रयागराज-उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
महेंद्रकुमार महामार्गावरील स्वाद नामक बेकरीत संशयित कामाला होता. त्याने पिडित तरुणीचे फोटो स्वत: च्या फेसबुक अकाऊंटमध्ये अपलोड केले होते. त्यानंतर तरुणीला व्हॉटस्ऍपवरून सतत एसएमएस करत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यानंतर 24 जानेवारी रोजी मोबाईलवरून कॉल करत अश्लील भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती.
संशयिताकडून सतत ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न सुरू होता. ही बाब तरुणीने कुटुंबियांच्याही कानावर घातली होती. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीसह कुटुंबियांनी येथील पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सातारा येथे असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक सातारा येथे रवाना झाले होते. पथकात पोलीस हवालदार पी.बी. कोकणे, पोलीस शिपाई वैभव ओहोळ, राम नागुलवार यांचा समावेश होता. संशयित सातारा येथील वाडा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी सापळा रचून मुसक्या आवळल्या.