रत्नागिरी: केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांना रत्नागिरीच्या भेटीचे निमंत्रण रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी दिले आहे.
अॅड. पाटणे यांनी मेघवाल यांची संसदेत भेट घेतली. याप्रसंगी अॅड. पाटणे यांनी स्वतः लिहिलेले रामशास्त्री हे पुस्तक त्यांना भेट दिले. रत्नागिरी ही लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यभूमी आहे. त्यामुळेच मेघवाल यांना रत्नागिरीचे आकर्षण असून त्यांना रत्नागिरी भेटीचे निमंत्रण अॅड. पाटणे यांनी याप्रसंगी दिले.
मेघवाल यांनी पाटणे यांचे लेखन आणि पुस्तकासंबंधी आस्थेने चौकशी केली. अॅड. पाटणे यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
या भेटीनंतर अॅड. पाटणे यांनी सांगितले की, राजकारणात मूल्यावर विश्वास ठेवून काम करणारी माणसे भेटली की व्यवस्थेवरचा विश्वास वाढत जातो. साधा सरळ स्वभाव, थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि सामाजिक भान असलेली दृष्टी यातून मेघवाल यांचे व्यक्तित्व भावले. त्यांनीही एक सफर हमसफर के साथ, ‘विश्वपटलपर गांधी’ सारखी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पगडीवरून राजस्थानी संस्कृतीचं अनोखे दर्शन होते.
मेघवाल सलग चार वेळा बिकानेरमधून (राजस्थान) संसदेवर निवडून गेले. तीन वेळा सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पॉलिटिकल सायन्समधून एमए, नंतर एलएलबी आणि फिलिपिन्स विद्यापीठातून एमबीए पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे पोस्टात टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. आयएएस म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय केला. सरकारी गाडीचा ते कधीच वापर करत नाहीत. सामाजिक भान ठेवून समाजोपयोगी अनेक कामे करीत असतात. भावना ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड कामे केली असून या सर्व विषयांवर यावेळी गप्पा रंगल्या.