मुंबई:महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन आज पासून संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने करण्यात आले.आज मंगळवारी या प्रशिक्षणाचा दुसरा आणि अंतिम दिवस असून प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे
आज सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यातील नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्यासाठी प्रशिक्षण संस्थान प्राइड (PRIDE) च्या द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.
संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रीय सहभाग घ्यावा, असा त्यांनी आग्रह व्यक्त केला.
सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावी, संसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा अभ्यास करावा, तसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचवले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ४३ आमदार उपस्थित होते, त्यापैकी ४ आमदार विधान परिषदेचे आणि उर्वरित विधानसभेचे होते. तसेच महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) ही उपस्थित होते.
उपराष्ट्रपती तसेच उपसभापतींशी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट
कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीश धनकड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली.
तसेच, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष चर्चा केली. असंघटित कामगार, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रश्नांवर राज्यसभेतून तोडगा कसा काढता येईल, यावर विचारविनिमय झाला.
राज्यसभेकडून महाराष्ट्राला कायम सहकार्य मिळेल, असे हरिवंश सिंह यांनी स्पष्ट आश्वासन दिले. तसेच, राज्यसभेचे कामकाज पाहण्याची संधी मिळाल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.