मुंबई:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत तब्बल ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून यातील सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.
त्यानंतर आता १० लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहेत. इन्कम टॅक्स खात्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे.
आयकर विभागाच्या माध्यमातून आता खात्याची तपासणी करून अपात्रतेच्या निकषांनुसार महिलांना अपात्र केले जाणार आहे. याची संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता महिला विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.सद्यस्थितीत चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू असून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची छाननी अद्याप सुरू झालेली नाही.दुसरीकडे राज्य सरकार या पाच लाख लाडक्या बहिणींकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. यावर महायुती सरकारमधील काही मंत्रींनी सुद्धा अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं कमी करण्यात आले आहे असे सांगितले आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपात्र बहिणी स्वतः पैसे परत करायला तयार असल्याचे सांगितले आहे.
शासन निर्णयानुसार 28 जून व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला,वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा एकूण अपात्र महिलांची संख्या 5,00,000 झाली आहे.
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर पैसे परत घेणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळाल्याने एक मोठी रक्कम सरकारला परत करावी लागणार असल्याने सध्या काही लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. तर आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याने अनेक कुटुंबे घाबरले आहेत.