राजापूर:-क्रॅश कार्ड आणि कूपनवर मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवत एका अज्ञात टोळक्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरातील अनेकांना या टोळक्याने गंडा घातल्याचे समोर आले असून या टोळक्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे .
कोल्हापूरमधील शुभांगी एन्टरप्राईजेस (राजारामपुरी , आठवी गल्ली) असे या क्रॅश कार्ड आणि डिस्काउंट कूपनवर छापण्यात आले असून कूपनची किंमत शंभर रुपये आहे. टोळक्यातील महिला प्रथम घराच्या दरवाजात येते आणि औषधे घेण्यासाठी पाण्याची मागणी करते. घरात एकट्या दुकट्या महिलेला पाहून ती घरात प्रवेश करते, असे अनेकांनी सांगितले. त्यानंतर आपण कंपनीचे काम करत असल्याचे सांगून शंभर रुपयांचे एक कूपन घेण्यास ती भाग पाडते. कोणी सहज कूपन घेतले तर त्याला आणखी एक कूपन घेण्यास भाग पाडते . या सर्व कूपनवर काही ना काही तरी लागतेच. त्यातून मोठी इलेक्ट्रिक वस्तू ज्या कूपनवर आहे, त्याची आगाऊ रक्कम घेऊन महिला पाच मिनिटांत वस्तू आपल्या गाडीतून घेऊन येते, असे सांगून निघून जाते. वस्तू देताना फोटो काढायचा असल्याचे सांगून ती तयारी करायला महिलेला सांगते. नंतर ती तेथून पोबारा करते. आपल्याला लागलेली वस्तू आजच मिळणार म्हणून पैसे देणारी व्यक्ती आनंदात वाट बघत असते. मात्र काही वेळानंतर त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
या कूपनवर २२ इंची एलईडी टीव्ही, शिलाई मशीन, फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, मोबाइल, मिक्सर व इस्त्री, ग्लास टॉप शेगडी अशा जवळपास १६ वस्तूंचा समावेश असून यातील जी वस्तू कूपन क्रॅश केल्यावर लागेल, ती अर्ध्या किमतीत घरपोच मिळण्याचे आमिष दाखवण्यात येते. पैसे घेऊन ती महिला पोबारा करते.
गेल्या दोन दिवसांत राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक महिलांना या टोळक्याने गंडा घातला असून आपले हसे होईल, या भीतीने अनेकांनी याबाबत तक्रार करण्याचे टाळले आहे.