मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित असताना सीबीएसई मंडळाने शाळांना गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकाबाबत आठवण केली आहे. शाळांच्या प्रत्येक वर्गात ४० पेक्षा जास्त विद्यार्थी असता कामा नयेत, असे या परिपत्रकात म्हटले होते.
त्यामुळे शाळांनी प्रवेश देताना ही मर्यादा लक्षात घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विविध श्रेणींसाठी अर्ज स्वीकारण्यासाठीचा ‘सरस’ कार्यक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या संलग्नता उपविधीनुसार प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त ४० असावी. प्रत्येक वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक चौरस मीटर एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणे गरजेचे आहे, असेही गेल्या वर्षी सीबीएसईने काढलेल्या परिपत्रकात म्हटले होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी पहिली ते बारावी या इयत्तांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवताना शाळांनी या नियमाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सीबीएसईने केले आहे. तसेच नव्या शाळांच्या किंवा सध्या संलग्न असलेल्या शाळांना संलग्नतेची व्याप्ती वाढवायची असल्यास ‘सरस’ म्हणजेच स्कुल फिलिएशन रीइंजिनिअर्ड ऑटोमेशन सिस्टिम हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सीबीएसईने म्हटले आहे. मंडळाशी अगोदरच संलग्न नसलेल्या आणि संलग्नता घेतलेल्या अशा शाळांना आपल्या शाळांची दर्जावाढ करण्यासाठी हा कार्यक्रम फायदेशीर आहे. संलग्न नसलेल्या शाळांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या शाळांसाठी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरापर्यंत संलग्नता घेणे, या आधी इतर बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा किंवा संस्थांसाठी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरापर्यंतची संलग्नता घेणे या कार्यक्रमाद्वारे शक्य असल्याचे मंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा व संस्थांना संलग्नतेला मुदतवाढ, माध्यमिक-उच्च माध्यमिक स्तरापर्यंत संलग्नता अद्ययावत करणे, शाळांची जागा बदलणे, दोन सत्रांमध्ये शाळा घेणे, शाळा-संस्थेचे नाव बदलणे, शाळा एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरीत करणे, नव्या विषयांचा समावेश करणे, शाळेच्या अखत्यारीत असलेली जागा वाढवणे किंवा कमी करणे ही कामे करता येणार असल्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत.