चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमधील सह्याद्री शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या प्राध्यापिक डॉ. लीना जितेंद्र जावकर यांनी लिहिलेल्या प्रोफेशनल कम्युनिकेशन या पुस्तकाचे प्रकाशन आमदार शेखर निकम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी थाटात संपन्न झाले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक फारच उपयुक्त असल्याचे मत आ. निकम यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पुणे येथील निराली प्रकाशन हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित हे पुस्तक प्रा. डॉ. जावकर यांनी तयार केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत या पुस्तकाची प्रशंसा करून प्रा. जावकर यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात बोलताना जावकर म्हणाल्या की, आज माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्वप्न सत्यात उतरण्याच्या आनंदाचा सोहळा आज अनुभवला. पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्रि शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणे आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या निराली प्रकाशन पुणे यांच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित होणे ही माझ्यासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्यामागे प्राचार्य श्री भोसले सर आणि मा. श्री धीरज वाटेकर सर यांनी मोलाचे सहकार्य केले. हे पुस्तक लिहिण्यामागचा फक्त एकच हेतू होता की, कोकण सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या, खेड्यापाड्यातून माध्यमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी शहराकडे धाव घेणाऱ्या मुलांना professional communiction हे सरळ साध्या भाषेत समजावे, त्याचप्रमाणे इंडस्ट्रीला अपेक्षित असणारे ऑफिस ड्राफ्टिंगचे नवीन फॉरमॅट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत. शैक्षणिक लिखाणाच्या प्रवासातील हे माझे पहिले पाऊल आणि त्यासाठी मिळणारा उदंड प्रतिसाद यांनी आज माझे मन भारावून गेले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. यावेळी आ. निकम यांच्यासह सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक श्री. भोसले, निराली प्रकाशनचे मार्केटिंग अससोसिएट तसेच निसर्ग अभ्यासक धीरज वाटेकर, अनिरुद्ध निकम, सचिन खरे, जनसंपर्क अधिकारी विनती ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, प्रमोद ठसाळे प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद खेड, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, परिमल भोसले, विकी नरळकर, विजय चितळे, विनायक वरवडेकर भाजपा सरचिटणीस, दिलीप आंब्रे उपाध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण, जावकर कुटुंबीय, मोरे कुटुंबीय, खडपे कुटुंबीय, वरवडेकर कुटुंबीय आणि हितचिंतक; डॉ. लीना जावकर यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सह्याद्री पॉलिटेक्निकच्या टेक्निकल टीमने प्रा. पल्लवी बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुस्त्रपद्धतींने पार पडली.