एस. टी. च्या 200 फेऱ्या धावणार
रत्नागिरी:-भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख यांचा उरूस 12 व 13 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटी प्रशासन देखील सज्ज झाले असून सुमारे 200 हुन अधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आह़े तसेच पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
उरूसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून जादा गाडयंची सुविधा करण्यात आली आहे. 12 फेबुवारी रोजी शहर बसस्थानक येथून सकाळी 6 वाजल्यापसुन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गरज पाहुन अधिकच्या बसची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे एसटी रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले आह़े. तसेच हरचिरी, चांदेराई ते हातीस, काजीरघाटी, सोमेश्वर ते हातीस अशा मार्गावर फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचेही एसटीकडून सांगण्यात आले. दरवर्षी यात्रेनिमित्त तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येत असते तसेच हातीस येथे छोटे वाहनतळ उभारले आहे.
यात्रेदरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी हातीस मार्गावर व दर्ग्यात, यात्रास्थळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारीही तैनात असणार आहेत.