रत्नागिरी : 25 लाखांचे कर्ज देतो अशी बतावणी करत फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेत त्याचीच तब्बल 3 लाख 58 हजार 153 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 27 ऑक्टोबर 2024 पासून 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली आहे.
ओमकार (पूर्ण नाव माहित नाही ) आणि गौरव संतोष मयेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात विष्णूदास बाबाजी ठाकूर (34,रा.टीआरपी अतुलीत बल धाम जवळ,रत्नागिरी) यांनी रविवार 9 फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, 27 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी विष्णूदास ठाकूर यांनी एका पेपरमध्ये आलेली जाहिरात पाहून त्यातील एका संपर्क क्रमांकावर संपर्क केला. बिल्डिंग मटेरियलसाठी त्यांना 25 लाखांचे कर्ज हवे असल्याचे त्यांनी संशयितांना सांगितले. तेव्हा संशयित ओमकारने तुम्हाला कर्ज दिले जाईल तुम्ही तुमची कागदपत्रे व्हॉटसअॅप करुन प्रोसेसिंग फी म्हणून 17 हजार 750 रुपये जमा करा. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे जमा केले.
त्यानंतर ओमकारने फिर्यादीला संशयित गौरव मयेकर हा आमच्या संस्थेत कामाला आहे. त्याच्या मोबाईलवर संपर्क कर असे सांगितले. फिर्यादीने मयेकरशी संपर्क केल्यावर त्याने फिर्यादीकडून कर्जाची रक्कम मिळण्यासाठी वेळोवेळी फि, शेअर्स खरेदी व अॅडवान्स हफ्त्यासाठी रकमेची मागणी करत एकूण 3 लाख 58 हजार 153 रुपये उकळले. एवढी रक्कम देउनही फिर्यादीला 25 लाखांचे कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318 (4),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.