चिपळूण :- कोकणातील प्रामुख्याने चिपळूणमध्ये पारंपरिक हातपाटी व्यवसायाला शासनाने तातडीने परवाने द्यावेत , अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जन आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.
कदम म्हणाले की, मध्यंतरी हातपाटीला परवाने देण्याच्या निविदा निघाल्या. मात्र, ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उत्खननास परवानगी नसल्याने हा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. त्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे अहवाल पाठवून मार्गदर्शन मागविले. मात्र, मुळातच हातपाटी वाळू व्यवसाय परवान्यांची निविदा काढलेली असताना व ड्रेझरद्वारे उत्खननाची निविदा नसतानादेखील केवळ हातपाटी वाळू व्यावसायिकांवर अन्याय करण्यासाठी परवाने दिले गेले नाहीत.
आता नव्याने सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळात याबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय व्हावा आणि हातपाटी वाळू व्यावसायिकांना न्याय मिळावा. तसेच वाळूशी संबंधित व्यवसायांना पुन्हा एकदा उभारी मिळावी, यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार आहोत. निर्णय न झाल्यास आम्ही जनआंदोलन करू, असा इशारा कदम यांनी यावेळी दिला.