रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असे उद्गार रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरिराम त्रिपाठी यांनी काढले.
उज्जैन येथील महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कवी कुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सुरू असलेल्या तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. माधवराव मुळ्ये भवनात झालेल्या संमेलन झाले.
प्रो. त्रिपाठी म्हणाले, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाला दिलेल्या भेटीत आश्वासक वक्तव्य केले. कोणत्याही उपक्रमाला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यानुसार ज्यांचे नाव संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राला ज्यांचे नाव दिले आहे, ते भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र साहित्याचे मराठी रूपांतर करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाईल. तसेच पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वैदिक संमेलन आयोजित करण्याचा विचारही केला जाईल. ज्या रत्नागिरीत यावेळचे संमेलन भरले आहे, त्या रत्नागिरीलाही मोठी परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याला दिशा देतानाच समृद्ध भारतीय वेदपरंपरेचाही खूप अभ्यास केला आहे.
मॅक्समुल्लर यांनी वेदांच्या निर्मितीचा कालखंड ख्रिस्तानंतर दोनशे-अडीचशे वर्षांचा असल्याचे सांगितले होते. मात्र टिळकांनी सखोल अभ्यास करून वेदांची निर्मिती ख्रिस्तापूर्वी चार हजार वर्षे झाल्याचे ओरायन या ग्रंथाच्या आधारे सिद्ध केले आहे. अशा आपल्या भारतीय समृद्ध वेदपरंपरेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा, असेही प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले.
विश्वविद्यालयाच्या वेद विद्या विभागाचे प्रमुख अमित भार्गव यांनी तीन दिवसांच्या संमेलनाचा आढावा घेतला. संमेलनात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील वेदाचार्य सहभागी झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्या विविध शाखांमधील विद्वानांनी आठ तास पारायण केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, संस्कृत पाठशाळा, वेदपाठशाळा आणि माधवराव मुळ्ये भवनात पारायण करण्यात आले. संमेलनात पहिल्या दिवशी प्रा. गणेश थिटे यांनी वेदाध्ययनाचे महत्व काय आहे हे सांगून प्राचीन कालापासूनच्या वेदांच्या परंपरेचे परंपरा विश्लेषण केले. दुसऱ्या दिवशी प्रा. अंबरीश खरे यांनी वेदांगांचा परिचय करून दिला. आज अखेरच्या दिवशी गणपतीपुळे येथे जाऊन मंदिरात तसेच समुद्रकिनारी सर्व शाखांमधील संहितांचे पारायण केले. संस्कृत वेदपाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, वेदपाठशाळेचे अध्यक्ष नाना मराठे समारंभाला उपस्थित होते.
सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. स्वरूप काणे यांनी सूत्रसंचालन केले. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी आभार मानले.