पुणे: पुण्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे.पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट आढळली आहे.सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही पाकिस्तानी चलनाची नोट आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस- 3 या सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट आढळली. त्यानंतर सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी तातडीने या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.सापडलेली पाकिस्तानी नोट वापरात असलेली असून, तिची स्थिती पाहता ती अनेक वेळा वापरण्यात आल्याचे दिसून येते. ही नोट कोणाच्या खिशातून चुकून पडली की ती अन्य कोणत्या कारणाने येथे आली, याचा तपास करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
पाकिस्तानी चलनाची नोट पुण्यात कशी आली? ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली? ती आपल्या देशामध्ये कोणाकडून आली? तिचा वापर कोण करत होते? पाकिस्तानमधून भारतामध्ये या नोटा कोण घेऊन आले? या सगळ्या गोष्टींचा तपास बावधन पोलीस करत आहेत. पाकिस्तानी चलनाची नोट आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.