प्रशांत पोवार / राजापूर:-राजापूर शहरातील चिंचबांध येथे असणारे पुरातन सुर्यमंदीर सध्या भग्नावस्थेत असुन या मंदिराची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे . तरी या मंदिराचा जिर्णोध्दार करुन त्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी राजापूरवासियान्मधुन करण्यात येत आहे.
राजापूर शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या काठावर चिंचबांध येथे असणारे पुरातन सुर्यमंदीर हे सातवाहन राजा गंडरादित्याने बांधले असल्याचे मानले जाते. याच सातवाहन राजा गंडरादित्याने राजापूरच्या प्रसिध्द गंगेवरील कुंडांचा जिर्णोधार केला असल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात.गंगेवरील कुंड ज्या काळ्या दगडात बांधली गेली आहेत तशाच प्रकारच्या काळ्या दगडात सुंदर रेखीव काम करुन हे छोटेखानी मंदीर बांधले गेले आहे . इतिहासकाळात राजापूर हे जगाशी व्यापार करणारे बंदर म्हणुन प्रसिध्द होते.या बंदरातुन जगाच्या कानाकोपऱ्यात व्यापार चालत असे.
शिवकाळात या राजापूर बंदराला दख्खनचे श्रीमंत प्रवेशद्वार म्हणुन ओळखले जात असल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात . या राजापूर बंदारातुन मसाल्याचे पदार्थ, हळद, खोबरे व पंचे म्हणजे वस्त्र सातासमुद्रापार पाठवली जायची. इंग्रज काळात राजापूरी पंचे,राजापूरी हळद, राजापूरी खोबरे या गोष्टी खुप प्रसिध्द होत्या. या बंदरातुन मोठ्याप्रमाणात मिठाचा व्यापारही चालत असे. इसवीसन १३१२ मध्ये विजापूरच्या आदिलशाहीच्या काळात येथील भूगोलाचा नकाशा बदलला असल्याचे मानले जाते. त्याकाळी प्रसिध्द असणाऱ्या राज देवी, विठ्ठल मदिर व सुर्य मंदीर या प्रसिध्द असणाऱ्या तीन मंदिरांपैकीच हे सुर्यमंदीर असाल्याचे अनेक जाणकार सांगतात. त्यामुळे या मंदिराचे शासन स्तरावरुन जतन व संवर्धन करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही वर्षापुर्वी राजापूर शहरातील काही नागरिकानी या मंदिराची साफसफाइ केली होती मात्र पुढे काळाच्या ओघात ते मंदीर तसेच जिर्णावस्थेत राहील्याचे राजापूरातील काही जाणकार मंडळीनी बोलताना स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत या मंदिरावर मोठ्याप्रमाणात झाडी वाढली असल्याने व ते आता पडण्याच्या स्थितीत असल्याने शासनाने या मंदिराचा जिर्णाध्दार करावा व त्या मंदिराचे संवर्धन करुन पुरातन वास्तु म्हणुन जतन करावे अशी मागणी राजापूरवासियान्मधुन करण्यात येत आहे.
भारतात फक्त तिन प्रख्यात सुर्यमंदीरे असुन त्यातील एक राजापूर तालुक्यातील कशेळी येथे कनकादित्य नावाने प्रसिध्द आहे. सातवाहन राजा गंडरादित्याने बांधलेल्या या पुरातन सुर्य मंदिराचे जतन व संवर्धन झाल्यास त्यातुन राजापूरच्या पर्यटनाला चालना मिळेल.