स्विमिंग टँकजवळ खेळत असताना घडला प्रकार; काठावरूनच बाहेर खेचले
राजापूर : स्विमिंग टँकजवळ खेळत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाला त्याच्यासोबत खेळणाऱ्या आठ वर्षांच्या नील मराठे या मुलाने मोठ्या धाडसाने सुखरूप पाण्याबाहेर काढले. वयाच्या आठव्या वर्षी नीलने प्रसंगावधान राखत केलेल्या धाडसी कामगिरीबाबत त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
राजापूर तालुका बार असोसिएशनचे ६वे स्नेहसंमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडले. या स्नेहसंमेलनात राजापुरातील सर्व वकील कुटुंबांसमवेत सहभागी झाले होते.
सायंकाळी कार्यकम सुरू असताना
त्यांच्यासोबत गेलेली सर्व लहान मुले एका बाजूला खेळत होती. या मुलांपैकी अॅड. अभिषेक ढवळे यांचा सहा वर्षांचा मुलगा रूद्र आणि अॅड. सुशांत पवार यांचा आठ वर्षांचा मुलगा नील खेळत खेळत जवळच असलेल्या स्विमिंगपुलाजवळ गेले. स्विमिंगपुलाच्या काठावर बसून पाण्यात चेंडू तसेच पोहण्याची ट्यूब टाकत असताना रूद्र याचा अचानक तोल गेला आणि तो स्विमिंगपूलमध्ये पडला. तसा तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
या वेळी नील याने क्षणाचाही विलंब न लावता काठावरून रूद्र याला हात देत पाण्याबाहेर खेचले. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी रूद्र आणि नील या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते. त्यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांचासुद्धा थरकाप उडाला.
नील याच्या वयाचा विचार करता रूद्र पाण्यात पडल्यानंतर तो देखील घाबरून तेथून पळून गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता; मात्र नील याने समयसूचकता दाखवत अत्यंत धाडसाने रूद्र याला पाण्याबाहेर काढत जीवदान दिले आहे. नील सुशांत पवार हा वरचीपेठ येथील शाळेमध्ये तिसरीमध्ये शिकत असून,
वयाच्या आठव्या वर्षी प्रसंगावधान, समयसूचकता आणि धाडस दाखवणाऱ्या नीलच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.