मासळी लिलाव गृह, उपाहार गृह, विश्रांती गृह, चौकीदार कक्ष, पार्किंग एरिया, लाईटची संपूर्ण जेटी परिसरात व्यवस्था होणार
राजापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील साखरे नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी इथल्या मच्छीमार बांधवांची होती. सदर मागणी मान्य होऊन शासनाने नाबार्ड अंतर्गत सुमारे 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून साखरी नाटे जेटीला मान्यता दिली आहे. आता या जेटीचे काम सुरू झाले असून विविध सुविधांनी सुसज्ज अशी ही जेटी होणार असून यामुळे तालुक्यातील आणि साखरे नाटे भागातील मत्स्य व्यवसायाला एक नवसंजीवनी मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर म्हणून साखरी नाटे गावाची ओळख आहे. पर्ससीननेट मच्छीमारी सह, पारंपारिक पद्धतीने सुद्धा या भागामध्ये मासेमारी केली जाते. इथला मच्छीमारांना आणि मच्छी विक्रेत्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि मासेमारी चा व्यवसाय चांगल्या पद्धतीने व्हावा याकरिता धाऊलवल्ली – साखरी नाटे – आंबोळगड या संपूर्ण सागरी पट्ट्यामध्ये भव्य अशी मच्छिमार जेटी म्हणजेच बंदर मोठ्या स्वरूपामध्ये मंजूर करण्यात आले आहे. या जेटीचे डिझाईन मत्स्य विभागाने केले असून, जेटीच्या कामाची एकझिक्यूशनची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आली आहे. जेटी करता आवश्यक असलेली सीआरझेड ची मान्यता देखील मिळालेली आहे. 9 ऑक्टोबर 2024 रोजी या बंदराच्या कामाला सुरुवात झाली.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरी नाटे येथील नियोजित बंदराच्या कामांमध्ये मच्छीमारांसाठी जाळे विणण्यासाठी शेड, संरक्षक भिंत, स्लीपिंग सॉफ्ट, बीच लँडिंग, मासळी लिलाव गृह, मत्स्य नौका दुरुस्तीसाठी लागणारी गियर शेड, प्रशासकिय इमारत, उपाहार गृह, विश्रांती गृह, बोट दुरुस्तीसाठी कव्हर शेड, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, स्वच्छता गृह ३, चौकीदार कक्ष, पार्किंग एरिया, लाईटची संपूर्ण जेटी परिसरात व्यवस्था, पाणी योजना, सांडपाणी निचरा व प्रक्रिया व्यवस्था, अग्निशामक व्यवस्था आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जेटीच्या परिसरात खाडी पात्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून जो गाळ साचलेला आहे तो सुद्धा काढण्यात येणार असून तो गाळ कामाच्या ठिकाणी वापरला जाणार आहे. याठिकाणी तीन जेट्टी उभारल्या जाणार आहेत. रेडिओ टॉवर उभारला जाणार आहे. फॅसिलिटी एरिया असणार आहे. मासे उतरवण्यासाठी सुमारे ७४० मिटरची जेट्टि उभारली जाणार आहे. पारंपरिक मासेमारांकरिता सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जाळे विणण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
साखरी नाटे बंदरासाठी जवळपास १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातील प्रत्यक्ष रक्कम ११८ कोटी रुपये या प्रत्यक्ष जेट्टीच्या कामासाठी खर्ची केले जाणार आहेत. खर तर सरकारचा हा एक पायलट प्रोजेक्टच म्हणावा लागेल. अशाच पद्धतीने दापोली हर्णै बंदराला सुद्धा मान्यता मिळाली आहे.