ग्रामस्थांनी रात्र काढली जागून, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची तत्परता
खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील खोंडे येथील सुमन अपार्टमेंट मागे शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास अचानक लागलेल्या वणव्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. वणव्याने रौद्ररूप धारण केल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी पोहोचून वणवा आटोक्यात आणल्याने नजीकच्या घरांना पोहोचणारा धोका टळला. मात्र वणव्याच्या भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
रात्रीच्या सुमारास वणवा लागल्याने ग्रामस्थांसह मदत कर्त्यांची तारांबळ उडाली. अग्निशमन दलातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनालक गजानन जाधव यांच्यासह बुरहान टाके, सुरज शिगवण व ग्रामस्थांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात यश आल्याने नजीकची घरे बचावली. हा वणवा लावला की लागला, या बाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.