राजापूर (प्रतिनिधी): समाज आणि कायदा हा एकमेकांशी जोडलेला आहे. त्यामुळे समाजात होत असलेल्या बदलाप्रमाणे कायद्यातही बदल होत असतात. भारतात नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांच्या माध्यमातुन न्यायाची बाजू अधिक भक्कम करतानाच अनेक कठोर तरतुदींमुळे नागरिक व देशहिताचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन लांजा न्यायालयाचे सरकारी वकिल एड. तृणाल सावंत यांनी येथे केले.
त्यामुळे भारतीय न्याय संहितेसह (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या कायद्यांचा अभ्यास करून त्याची माहिती करून घेऊन आपण सगळयांनी अधिक जागरूक झाले पाहिजे असेही एड. सावंत यांनी नमुद केले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या नवीन कायद्यांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, एड. मिलिंद चव्हाण, एड. सुनैना देसाई, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, वनपाल जयराम बावदाणे, पोलीस उपनिरीक्षक सुधिर उबाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना एड. सावंत यांनी भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या तिन्ही कायद्यांतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी व झालेले बदल याबाबत विस्तृत माहिती दिली.
भारतीय न्याय संहितेतंर्गत झालेल्या नवीन कायद्यांतर्गत ३० कलमांमध्ये शिक्षा वाढविण्यात आली आहे, ८३ कलमांमध्ये द्रव्य दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. २३ कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. तर १०० कलमे ही मुळे कलमांमध्ये समाविष्ठ करण्यात आल्याचे एड.सावंत यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना एड. सुनैना देसाई यांनी नवीन कायद्यांतर्गत महिलांसाठी असलेले वेगवेगळे कायदे व तरतुदी याबाबत माहिती दिली. तर एड. मिलिंद चव्हाण यांनी या नवीन कायद्यांतर्गत विविध तरतुदी, शिक्षा व अन्य पुरावे व कायद्यातील तरतुदी याबाबत माहिती दिली. तर याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे व पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी देखील नवीन कायदे, त्यातील कलमे व अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी केले. प्रारंभी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या शिबीराला राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, जी. आर. कुलकर्णी, गायत्री हर्डीकर, कोदवली सरपंच सौ. भोसले, अमृत तांबडे आदींसह व्यापारी, पोलीस पाटील, सरपंच, शासकिय कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेचे राजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते.