पदवीधर हृषिकेश केळकरचे यश; शिक्षणासोबत प्रकल्पाचे काम
दापोली : वाणिज्य शाखेतून एमबीएचे शिक्षण घेत वडिलोपार्जित कोळंबी प्रकल्पामधून आंबवली बुद्रुक येथील हृषिकेश केळकर हा तरुण दरवर्षी हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळवत आहे. शिक्षणासोबत या कल्पामध्ये वेगवेगळ्या संकल्पना बवून उत्पन्न वाढवण्याचा हृषिकेशचा मानस आहे.
केळशीपासूनच जवळच असलेल्या आंबवली बुद्रुक येथील शेतकरी महेश केळकर यांनी खाडीच्या पाण्याचा
वापर करून स्वतःच्या मालकीच्या जागेत १९९८ साली कोळंबी प्रकल्प सुरू केला. केळशी उटंबर परिसराला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा उपयोग करून कोळंबी प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आंबवलीतील महेश केळकर यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. येथील गरीब शेतकऱ्याजवळ आर्थिक बाब नसल्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प उभा करण्यात जोखीम असल्याने येथील शेतकरी आंबा, काजू, नारळ, सुपारी यांचे उत्पादन घेण्यात व्यस्त राहिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे; परंतु महेश केळकर यांनी मोठे धाडस दाखवत हा कोळंबी प्रकल्प उभा केला आहे.
सुरुवातीला त्यांनी टायगर कोळंबीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. काहीतरी वेगळा व्यवसाय करावा, असे विचार या शेतकऱ्यांच्या मनात आले. त्यामुळे त्यांनी खाडीचे पाणी आपल्या शेतात घेऊन कोळंबी प्रकल्प साकारला. या प्रकल्पातून दरवर्षी दर हेक्टरी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पॉड तयार करण्यासाठी व प्रकल्प उभारण्यासाठी येणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो. प्रकल्पाच्या जागेचे प्रथम निर्जंतुकीकरण करून काही प्रमाणात शेवाळ तयार केली जाते. पंधरा ते वीस दिवसांनंतर केसाच्या आकाराएवढे कोळंबी बीज त्यामध्ये सोडले जाते. कोळंबी बीज हे चेन्नई, विशाखापट्टणम, आदी ठिकणांहून आयात केले जाते. कामगार मजुरी औषधे यांचा खर्च जवळजवळ लाख रुपये येतो. पॉड्सची बांधणी, गेट पंप, बंधारा जाळी, आदींचा समावेश असतो; मात्र पॉड तयार झाले की कोळंबी बियाण, कोळंबीचे खाद्य यावर खर्च करावा लागत आहे. दिवस रात्र या तलावाची राखण करावी लागते. 400 ते 500 रुपये किलो दराने ही कोळंबी बाहेरगावी पाठवली जाते 1998 पासून सुरू केलेला प्रकल्प 2008 पर्यंत स्वतः चालू चालवला नंतर टायगर कोळंबीच्या येणाऱ्या बियाण्यामध्ये वेगवेगळे रोग येऊ लागले त्यामुळे 2008 ते 2013 पर्यंत बंद होता. त्यानंतर पुन्हा 13 ते 23 पर्यंत हा प्रकल्प भाड्याने चालवायला दिला होता. महेश यांचा मुलगा ऋषिकेश केळकर यांनी हा प्रकल्प 1 जानेवारी 2024 पासून नव्याने सुरू केला.