रत्नागिरी :- रत्नागिरीतील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या कैद्याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने (ग्रामीण) सोलापुरातील मंगळवेढा येथील एका शेतात अटक केली. त्याच्याकडे एक पिस्टल व ५ जिवंत काडतुसे सापडली आहेत. फाईक मुस्ताक करंबेळकर (४६, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे.
कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार या संशयिताने त्याची शेतात राहण्याची सोय केली होती. निंगोडा बिराजदारच्या भावाकडेही तीन पिस्टल आणि २१ जिवंत काडतुसे सापडली.
रत्नागिरीतील फैयाज हकीम खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नाही. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक करंबेळकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये असताना निंगोडा हणुमंत बिराजदार याच्याशी ओळख झाली होती. पॅरोल संपल्यानंतर फरार झालेल्या फाईकला बिराजदार याने मंगळवेढा येथील एका शेतात त्याच्या शेतात पत्राशेड करून राहण्याची सोय केली होती. त्याची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला. तो सतत पिस्टल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाई केली नाही. त्याला बेसावध असताना पकडले. त्या वेळी त्याच्याकडे पिस्टल व पाच जिवंत काडतूस सापडले. त्या संदर्भात विचारणा केल्याने त्याने पिस्टल निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
पिस्टल विक्रीसाठी आणली…
पोलिसांनी निंगोडाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात तीन पिस्टल व १८ जिवंत काडतुसे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ पिस्टल व २१ जिवंत काडतुस सापडले. ही पिस्टल विक्रीसाठी त्यांनी आणली होती, अशीही माहिती समोर आली. ते कोठून आणले, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने तिघांनाही ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
रत्नागिरीतील फैयाज हकीम खून प्रकरणातील पॅरोलवरील फरारी आरोपीला सोलापुरात अटक
