ठाणे : पदे येतात आणि जातात पण शहराची विकास कामे कसे करता, राज्य पुढे कसे नेता, हे महत्वाचे आहे. ठाणे हे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्याची सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे शहराचा विकास हा पर्यावरणपूरक असायला हवा.
सर्वसामान्यांना घरे मिळावी म्हणून नियमात बदल केले जातील मात्र त्याचा फायदा विकासकांनी ग्राहकांना ही व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील क्लस्टर योजना राबविण्यासाठी खासगी विकासकांना आमंत्रित केले.
क्रेडाई एमसीएचआय ठाणे आयोजित 22 व्या रिअल इस्टेट आणि हौसिंग फायनान्स एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेली २२ वर्ष मी प्रॉपर्टी प्रदर्शनाला येतोय पण तुम्ही रॉयल्टी दिली नाही, असे बोलत मी कुठल्याही कामाची रॉयल्टी न घेता काम करत आहे. ठाण्यातील घरांना लोकांची पसंती मिळत असून ठाणे सर्वार्थाने बदलत आहे. मेट्रो, रस्त्यांचे जाळे उभे केले जात असून ३० लाखांपासून ३ कोटीपर्यत घरे मिळत आहे.
ठाण्याला मिळाले ८० हजार कोटी – सरनाईक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे भाग्य विधाता असून त्यांनी ठाण्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ७० ते ८० हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याने पुढील दहा वर्षात ठाणे शहर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श शहर बनणार यात शंकाच नाही, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासात्मक प्रकल्पांसाठी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणे शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय आहे. ११०० कोटी खर्च करून मिसिंग रोड विकसित करून अन्य उपाययोजनांसह वाहुतक कोंडीची समस्या सोडविली जाईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रेडाई चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी मांडून १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात होणाऱ्या वाढीमुळे उद्योगावर फार परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करीत ठाण्याची स्वतंत्र शहर म्हणून ओळख निर्माण होईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच याप्रसंगी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती देत आगामी काळात मुंबईप्रमाणे ठाणे हे स्वतंत्र वटवृक्ष, स्वतंत्र शहर झालेला दिसेल असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर ठाणे शहरातील विकासात क्रेडाई एमसीएचआय ची भूमिका अजय आशर यांनी विस्तृतपणे मांडली.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल, क्रेडाई चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, डॉमनिक रोमेल, अजय आशर , स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप महाव्यवस्थापक सुरजित त्रिपाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक विकासक आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.