गोवा: गोव्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरुन कोळसा वाहतूक होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले. विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.
गोव्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर तीन नवीन रेल्वे स्थानक प्रास्तावित आहेत. यात नेवरा, सारझोरा आणि मये या स्थानकांचा समावेश आहे. नव्याने होणारी रेल्वे स्थानक का केली जात आहेत? असा सवाल सिल्वा यांनी उपस्थित करताना यातून कोळसा वाहतूक आणि इतर प्रदूषण संबधित पदार्थांची वाहतूक करण्याची योजना असल्याचा दावा सिल्वा यांनी लक्षवेधीतून केला.
स्थानिकांचा विरोध होत असताना सरकार अशा गोष्टी का करतेय? असा सवाल देखील सिल्वा यांनी उपस्थित केला. तसेच, हव्या आहेत त्या गोष्टी न ते नको त्या गोष्टी का माथ्यावर मारल्या जात आहेत, असा प्रश्न सिल्वा यांनी केला. सिल्वा यांच्या लक्षवेधीवर आमदार वीरेश बोरकर आणि आमदार वेंझी व्हिएगस यांनी देखील मत मांडले. दरम्यान, रेल्वेचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, एवढे सांगून मुख्यमंत्र्यांनी विषय गुंडाळला.
कोळसा वाहतुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकण रेल्वे मार्गे कोळसा वाहतूक होणार नाही. याबाबत कोणाला आक्षेप असल्यास लेखी स्वरुपात द्यावा. आम्ही तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन सभागृहाला दिले.
नुकतेच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यात रेल्वेसाठी विविध विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यात नव्याने तीन रेल्वे स्थानक होणारेत. तसेच, मडगाव रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण देखील होणार आहे.