रत्नागिरी:–रत्नागिरी पोलीस दलातर्फे आज नवीन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, प्राचार्य मकरंद साखरकर, प्रा. चित्रा गोस्वामी, प्रा. ॲड. सोनाली खेडेकर, ॲड.आशीष बर्वे, प्रा. सुनील गोसावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना मान्यवर मंडळींनी विविध कायद्यांसंदर्भात माहिती दिली. यामध्ये पोक्सो कायदा, विशाखा समिती, निर्भया समिती, लहान मुला-मुलींचा लैंगिक छळ अशा अनेक कृत्यांचे प्रकार सांगून कायद्यात झालेले आमूलाग्र बदल, बदललेल्या कायद्यांचा उद्देश व कायद्याचा धाक व नमूद केलेल्या शिक्षेबाबत माहिती दिली.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) या कायद्यातील तरतुदी, मोबाइलचा वापर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर व त्यातून निर्माण होणारे दखलपात्र अपराध याबाबत सखोल विश्लेषण करून माहिती दिली. पाठलाग, ऑनलाइन पाठलाग, धार्मिक पोस्ट, धर्माचा अपमान करणारे ईमेज-मेसेज व्हिडीओ फॉर्वर्ड करणे, प्रसारित करणे याचेदेखील गांभीर्य समजावून सांगण्यात आले.
ऑनलाइन फ्रॉड, फसवणाऱ्या लिंक, ओटीपी शेअर, आलेल्या मेसेजची/व्हिडीओची खात्री याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. बीएनएसएसमधील इलेक्ट्रॉनिक पुरावे त्याचे महत्त्व कायद्यात मान्यता व शिक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयीन स्तरावर महिला कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
कार्यशाळेला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर, आयपीएसएस निखिल पाटील, शहर पोलीस निरीक्षक शिवरकर आदी उपस्थित होते.