गोव्यातील कंटेनर चालकाला शिक्षा
संगमेश्वर:-मुंबई- गोवा महामार्गावरील धामणी येथे कंटेनरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यु झाला होता. कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायाधीशांनी 20 हजार रुपये दंड व तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
राजु मोहन दास (रा. गोवा) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेवून 12 फेब्रुवारी 2021 रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनर धामणी येथे आला असता पादचारी श्रीराम तुकाराम वनकर यांना कंटेनरची धडक बसली. या अपघातात वनकर यांचा मृत्यु झाला. याबाबतची फीर्याद पोलीस पाटील अनंत पाध्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार कंटेनर चालक राजु दास याच्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून राजु दास याला न्यायाधीश श्रृती पाटील यांनी भा.द. वि. क. 279 प्रमाणे तीन महिने सश्रम कारावास, 304 ए प्रमाणे 6 महिने सश्रम कारावास आणि 10 हजार रूपये द्रव्यदंड, मो. वा. का. क. 184 प्रमाणे 3 महिने साधा कारावास, 134(अ)/177 प्रमाणे 5 हजार द्रव्य दंड, 134 (ब)/177 प्रमाणे 5 हजार दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारवास शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा या एकत्रित भोगावयाच्या आहेत. 20 हजार रूपयांचा दंड मयत वनकर यांच्या पत्नीस द्यावयाचा आहे.
याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अमृता गुरूपादगोळ, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अमीत यादव, तपासीक म्हणून पोलीस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक चंदू कांबळे, कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार एस. एस. कामेरकर यांनी काम पाहिले.