राज ताठरे / फुणगुस: संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेले संगमेश्वर फुणगुस येथील दर्गा हजरत शेख जाहीर शेख पिर यांचा वार्षिक उर्स महोत्सव ११ फेब्रुवारी पासून सुरू होत असून १४ फेब्रुवारी रोजी नियाज (कंदोरी)ने चार दिवसीय उर्स उत्सवाची सांगता होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी किनारी निसर्गाच्या सानिध्यात हजरत शेख जाहीर शेख पिर बाबा यांचा सर्वांग सुंदर असा दर्गा उभा आहे. दर्गेतील काचेची कलाकृती ही नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला असून पर्यटकांना देखील या कलाकृतीने भुरळ पाडली आहे. हजारो पर्यटक ही कलाकृती आणि दर्गेची रचना पाहण्यासाठी येत असतात.तर नवसाला पावणारा जागरूक दर्गा म्हणून देखील या दर्गेची ख्याती राहिली आहे.त्यामुळे वर्षाकाठी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे या उर्स उत्सवाची सर्वांना प्रतीक्षा असते.
इस्लामी महिन्यानुसार शाबान महिन्याच्या १४ तारखेला या दर्गेचा उर्स मुबारक साजरा केला जातो. तत्पूर्वी दोन दिवस अगोदर कार्यक्रमांना सुरुवात केली जाते. त्याअनुषंगाने यावर्षी ११ फेब्रुवारी रोजी चुना मुबारकने उर्स कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तर १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दर्गा व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर यांच्या निवासस्थानातुन संदलची मिरवणूक निघणार आहे.तसेच रात्री संदल मिरवणूक आणि १० वाजता दर्गा पटांगणात नूराणी रातीबचा कार्यक्रम होणार आहे.मुसव्वीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली नुरानी रातीब मैफिल हा कार्यक्रम सादर करणार आहे.
१३ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने उर्स मुबारक चा कार्यक्रम साजरा होणार आहे.तसेच १४ फेब्रुवारी रोजी नियाज (कंदोरी)चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी ३ वाजता चार दिवसीय उर्स महोत्सवाची सांगता होणार आहे.या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर, मुसव्वीर मुजावर, मुझम्मिल मुजावर यांनी केले आहे.
तिसरी पिढी कार्यरत होणार
या वर्षाच्या उर्स मुबारक चे वैशिष्ट्य म्हणजे मुजावर कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडे दर्गे चे व्यवस्थापन जाणार आहे.पै.नासिर मुजावर यांचे चिरंजीव युवा व्यक्तिमत्व मुस्ववीर मुजावर हे पुढील काळात दर्गेचे व्यवस्थापन संभाळणार आहेत. त्यामुळे हजरत शेख जाहीर शेख पिर या दर्गेला आता तरुण व्यवस्थापन मिळणार आहे.