लांजा : वार्ताहर
पत्नी, मुलांच्या आणि नातेवाईकांच्या नावाने खोडसाळ व बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या बेनीखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी ५ जानेवारी रोजी आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला. न्याय मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमधून हटणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. मनमानी करणाऱ्या सदस्यांवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बेनीखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मनमानी करणाऱ्या सदस्यांविरोधात चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, लांजा तहसीलदार, पंचायत समिती यांच्याकडे केली आहे. दरम्यान माहितीच्या आधाराखाली बेनीखुर्द-खेरवसे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सरकारी योजनांची माहिती मागवली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे सदस्यांचा अंदाधुंद आणि स्वार्थ हेतूचा कारभार उजेडात आला असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. सदस्यांची सखोल चौकशी करून व कारवाई करावी यासाठी लांजा गटविकास अधिकारी यांना २० डिसेंबर २०२४ रोजी एक निवेदन देण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित सदस्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गटविकास अधिकरी यांनी ९ जानेवारी २०२५ रोजी चौकशी करण्यात येईल अशी ग्रामस्थांना तारीख दिली होती. ९ जानेवारी तारीख टळून गेल्याने ग्रामस्थांनी पुन्हा पंचायत समिती येथे जाऊन गटविकास अधिकारी यांची भेट घेवून विचारणा केली असता मिटिंग असल्याचे कारण देत ५ फेब्रुवारी २०२५ रोजी चौकशी घेण्यात येईल असे ग्रामस्थांना सांगितले होते. त्यानुसार बुधवारी पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकारी संजय लोखंडे हे बेनीखुर्द ग्रामपंचायत येथे हजर झाले होते. चौकशी तहकूब करण्यात येत असल्याचे लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगताच चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यलयात अडवून ग्रामस्थांनी अडवून धरले. मात्र वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तो पर्यंत ग्रामपंचायत येथून जायला देणार नाही असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता. जवळपास दोन तास ग्रामस्थांचा हल्लाबोल सुरू राहिल्याने ग्रामस्थांसमोर नमते घेत पंचायत समितीचे अधिकारी यांनी अखेर बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायत येथे धाव घेतली होती.
दरम्यान ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय बंडबे (बेनीखुर्द) व सदस्य किरण गुरव (खेरवसे) यांनी व अन्य सदस्य यांनी सरकारी योजनांची कामे खोडसाळ कागदपत्रे तयार करून स्वतःच्या कुटुंबातील मुलगा, पत्नी व मुलींच्या नावाने मंजूर करून स्वतः मक्तेदारी घेतली. शासकीय नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत चुकीच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या सदस्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र पंचायत समिती प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य केले नसल्याचाही नागरिकांनी ठपका ठेवला. ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका महिला व पुरुष ग्रामस्थांनी घेतली होती.
एक तास चाललेल्या नागरिकांच्या आक्रमक भूमिकेपुढे हतबल होऊन पंचायत समितीकडून प्रतिनिधी म्हणून आलेले विस्तार अधिकारी संजय लोखंडे यांनी गटविकास अधिकारी यांना बोलावून घेतले. तासाभराने सहाय्यक गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांची बाजू समजावून घेत अखेर ग्रामस्थांच्या रेटयापुढे संबंधित सदस्यांना चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. चौकशी करून आम्हांला न्याय द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
तब्बल चार तास ग्रामस्थांनी बेनीखुर्द ग्रामपंचायत येथे ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांचा राग अनावर न झाल्याने अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचायत समिती प्रशासनाने पाठविलेला प्रतिनिधी यांनी आजच चौकशी करून अहवाल द्यावा असा आग्रह नागरिकांनी धरल्याने सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायत येथे चौकशी प्रक्रिया सुरू होती. तो पर्यंत ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठाण मांडून होते. चौकशीअंती अधिकारी यांनी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले त्यानंतर ग्रामस्थांची भूमिका मावळली.