संगमेश्वर / प्रतिनिधी :- कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. हे प्रदर्शन शासनामार्फत घेण्यात येत असून या प्रदर्शना मध्ये कलाकारांच्या कलाकृतीची निवड होणे हि अभिमानाची बाब समजली जाते. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ६४ वे महाराष्ट्र राज्य कलाकार विभाग कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे संपन्न होत असून या प्रदर्शनात सह्याद्री स्कुल ऑफ आर्ट सावर्डेच्या माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनामध्ये सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी राकेश देवरुखकर, विक्रांत बोथरे,संदेश मोरे, मकरंद राणे, कौस्तुभ सुतार या विद्यार्थ्यांच्या कलाकार विभागात प्रदर्शना करीता निवड करण्यात आली आहे. यामध्ये राकेश देवरुखकर यांना राज्यशासनाचा पुरस्कार आहे.हा पुरस्कार त्यांना सलग तिसऱ्या वेळी मिळाला आहे. देवरुखकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे खास कौतुक होत आहे. तसेच संदेश मोरे याला देखील राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
एकूण १५ चित्रकारांच्या कलाकृतींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पंधरा कलाकारांना ५२०००/-रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र पारितोषिक मिळाले आहे. त्यामध्ये राकेश देवरुखकर व संदेश मोरे यांचे नाव असून सह्याद्रि शिक्षण संस्थचे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कलामहाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.