प्रशासन, महावितरणला निवेदन
रत्नागिरी:-जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत दिलेले विद्युत मीटर बदलून त्या जागी अदानी समूहाकडून नवीन स्मार्ट व प्रीपेड विद्युत मीटर जोडणीस सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या मीटर जोडणीसाठी तीव्र विरोध आहे. अशी जोडणी तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी तसेच महावितरणला निवेदन देण्यात आले. तसेच ही जोडणी थांबवली नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यासह तालुका, शहर कार्यकारिणी पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. स्मार्ट व प्रीपेड विद्युत मीटर जोडून गोरगरीब जनतेला वेठीस धरून त्यांची ससेहोलपट होता कामा नये. तसेच अदानी समूहासाठी विभागीय कार्यालयात देण्यात आलेले कार्यालय प्रथमत: खाली करण्यात यावे, अशी भूमिका यावेळी पुनसकर यांनी मांडली. अदानी समूहामार्फत स्मार्ट व प्रीपेड मीटर न बसवता महावितरण कंपनीचे बसवलेले मीटर आहे तसेच ठेवण्यात यावेत. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.