चिपळूण:-तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या अस्तित्व आढळून आलेल्या पाऊलखुणा, दोन म्हशींची झालेली शिकार आणि स्थानिकांकडून वाघाच्या अस्तित्वाबाबत सुरू असलेल्या चर्चा या पार्श्वभूमीवर वनविभागाने तळसरबरोबरच कुंभार्ली घाटातही कॅमेरे ट्रप बसवले. मात्र महिनाभरात वन्यप्राण्यांशिवाय वाघाच्या अस्तित्वाच्या कोणत्या पाऊलखुणा न सापडल्याने अखेर सर्व कॅमेरे वनविभागाने काढून घेतले आहेत.
तळसरच्या जंगलात 20 डिसेंबरच्या दरम्यान पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा, मारलेल्या दोन म्हैशी, शिकार केलेल्या म्हैशीला खाण्याची पद्धत आणि पंजाच्या ठशांचा आकार पाहता तो वाघच असण्यावर प्राथमिक स्तरावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाघाचा ठोस आढळ निष्पन्न होण्यासाठी वनविभागाने जंगलातील वाटांवर वनविभागाने तब्बल 7 कॅमेरा ट्रप लावले. मात्र त्यामध्ये रानकुत्री आणि बिबटयाशिवाय फारसे कुणी दिसलेले नाही. त्यानंतर कुंभार्ली घाट परिसरातही वाघाच्या अस्तित्वाच्या चर्चा होऊ लागल्यानंतर घाट परिसरातही 4 कॅमेरे वनविभागाने बसवले. शिवाय या भागातील पोफळी, कुंभार्लीसह सह्याद्रीच्या पायथ्यालगतच्या गावांतही आणखी कॅमेरे बसवण्याचा विचार करत त्यासाठी आणखी 25 कॅमेऱ्याची मागणी वरिष्ठस्तरावर करण्यात आली होती. दरम्यान लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर सर्व कॅमेरे वनविभागाने काढून घेतले आहेत.