दोघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा
चिपळूण:-तालुक्यातील अलोरे येथे रस्त्याने घरी जेवणासाठी जात असलेल्या एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी भरदुपारी 1.30 च्या सुमारास हॉकिस्टीकचा प्रहार केल्याची घटना सोमवारी घडली. यात तरुण जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञातांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद संदीप राजाराम जाधव (37, अलोरे) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जाधव याचे अलोरे बाजारपेठे येथे पान टपरीचे दुकान आहे. सोमवारी दुपारी 1.30च्या सुमारास ते दुकान बंद करुन अलोरे मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने आलोरे-बौध्दवाडी येथे घरी जेवण्यासाठी जात होते. असे असताना एका काळया रंगाच्या दुचाकीवरुन दोन व्यक्ती संदीपच्या मागून आल्या व त्यांनी त्याच्या उजव्या पायावर हॉकीस्टीकने जोरात प्रहार केला. यात तो जखमी झाला. भरदुपारी झालेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. संदीप याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखत घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी त्या अज्ञातांचा शोध सुरू केला आहे.