मंडणगडातील घटनेने अंगावर शहारा आणणारी घटना
नऊ महिन्यात ना कुठली तपासणी… ना उपचार
मंडणगड : येथील चिरेखाणीवर काम करणाऱ्या 20 वर्षीय गरोदर, अशिक्षित, अमराठी विवाहितेला तेथील खाण चालक व तिचा पती रविवारी सायंकाळी अवघडलेल्या अवस्थेत दापोली घेऊन आले. मात्र मंडणगड येथील आरोग्य विभागाकडून कोणत्या प्रकारची पूर्वतपासणी केलेली नसताना, कोणत्याही प्रकारचे औषधोपचार चालू असतानाही येथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी तिची सुखरूप ‘सुटका’ केली. तिला 2 मुली झाल्या. मात्र तिला आणण्यात 5 मिनिटे जरी उशीर झाला असता तर काहीही होऊ शकले असते, अशी माहिती दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील चिरेखाणींवर न पोहोचलेल्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मंडणगड तालुक्यातील शेडवई येथे चिरेखाणींचा मोठा व्यवसाय आहे. तेथे उत्तरप्रदेश येथून राकेश बनवासी व सोनी बनवासी हे दांम्पत्य कामाला आहे. चिरेखाणीवर कामाला आली तेव्हा सोनी बनवासी गरोदर होती. तरीही ती चिरेखाणीवर जड काम करत होती. वास्तविक पाहता चिरेखाण मालकाने तिला काम करण्यास प्रतिबंध करणे व तिच्याबाबत आरोग्य यंत्रणेला कळवणे गरजेचे होते. मात्र खाणमालकाने तसे केलेले नाही. रविवारी तिच्या अचानक पोटात दुखू लागल्यामुळे चिरेखाण चालक रमेश चव्हाण यांनी तिला तिच्या पतीच्या मदतीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले. वास्तविक पाहता त्यांचा तालुका मंडणगड असल्याने त्यांनी तिला मंडणगड येथे घेऊन जायला हवे होते. मात्र तेथे पुरेशा सोयीसुविधा नसल्याने त्यांनी दिला दापोली येथे आणले.
वास्तविक पाहता गरोदर मातेची तिसऱ्या, पाचव्या व नवव्या महिन्यात अशी सरकारी खर्चाने तीनवेळा सोनोग्राफी करण्यात येते. शिवाय तपासण्या करून यात काही कमतरता आढळल्यास त्यांना आवश्यकतेनुसार औषधोपचार सुरू करण्यात येतात. तसेच एखाद्या महिलेचा रक्तदाब कमी-अधिक असेल तर त्याप्रमाणे त्यांना गरजेप्रमाणे औषधोपचार करण्यात येतात. मात्र सोनी बनवासी या महिलेची यापैकी कोणतीही शासकीय तपासणी मंडणगड तालुक्यातील आरोग्य विभागाच्यावतीने झाली नव्हती. तिला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत कोणत्याही गोळया सुरू करण्यात आल्या नव्हत्या. हे देखील दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पालमरे यांच्या लक्षात आले. मात्र सोनी बनवासीची अवस्था फारच बिकट असल्याने माणुसकीच्यादृष्टीने त्यांनी व त्यांच्या टीमने तातडीने तिची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर पाचव्याच मिनिटाला सोनी बनवासीने एका मुलीला जन्म दिला. मात्र त्या मुलीचे वजन केवळ 1 किलोग्रॅम एवढेच होते. पाचच मिनिटात तिचे पुन्हा पोट दुखू लागल्याने लक्षात येता पुन्हा सर्व तयारी करण्यात आली व तिने 5 मिनिटाच्या अंतराने आणखी एका मुलीला जन्म दिला. मात्र दुसऱ्या मुलीचे वजनही केवळ 1 किलो 100 ग्रॅम होते. यानंतर डॉक्टरांनी पुढील धोका ओळखून त्यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी पाठवले. जर या मातेची तिसऱ्या, पाचव्या व नवव्या महिन्यात सोनोग्राफी झाली असती तर तिच्या उदरात दोन जीव आहेत, हे आधीच लक्षात आले असते. शिवाय तिला जर रक्तवाढीच्या, कॅल्शियमच्या, आयर्नच्या गोळ्या सुरू केल्या असत्या तर बाळ व आईचे आरोग्य चांगले राहिले असते. मात्र तिची या प्रकारची कुठचीही तपासणी झाली नव्हती. यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.