शंभर दिवसांत कार्यवाही पूर्ण करा
मुंबई : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील शंभर दिवसांत ही सर्व पदे भरली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला – बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस
पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल.