संगमेश्वर : व्याघ्र प्रकल्पातील प्राणी, पक्षी, कीटक व तेथील जैवविविधता यांची माहिती देणारे केंद्र कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा या ठिकाणी वन विभागाकडून उभारण्यात आले आहे. केंद्राला कोकणासह घाटातील अनेक पर्यटक भेट देऊन व्याघ्र प्रकल्पाची माहिती संकलित करत आहेत. लवकरच हे केंद्र सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती वनपाल मनीषा देसाई यांनी दिली आहे.आंबा घाट ते चांदोली अभयारण्यपर्यंत सह्याद्री पर्वतरांगांवर व्याघ्र प्रकल्प शासनाने उभारला आहे.
सह्याद्रीच्या रांगा या कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचे काम करताना, हा प्रकल्प कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दुवा म्हणून निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये अनेक वन्य प्राणी, पक्षी कीटक, खनिजे, निसर्गरम्य धबधबे धरण, यांसह फळा फुलांनी सजलेला हा परिसर आहे. याचा मोह सर्वांनाच पडतो. या व्याघ्र प्रकल्पामध्ये जाण्यास बंदी ठेवण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती मिळवणे कठीण बनले होते. याचीच जाणीव शासनाने ठेवून आंबा या गावामध्ये मुख्यमार्गालगत असलेल्या वनविभागाच्या कार्यालयात सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प नावाने माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. केंद्रामध्ये भिंतीवर लाईट्स द्वारे फलक सजवण्यात आले आहेत. या फलकांवर प्राणी, पक्षी, कीटक, फुले, खडक, माती यांचे फोटो व त्यांचे स्थानिक नाव यांसह त्यांचे कार्य याची माहिती लिखित स्वरुपात ठेवण्यात आली आहे. याच बरोबर या व्याघ्र प्रकल्पातील प्राणी, पक्षी यांचे आवाज देखील पर्यटकांना ऐकता येतील अशी सुविधा ठेवण्यात आली आहे. जंगल परिसरात सापडणाऱ्या जुन्या झाडांवरील बुरशीजन्य कीटक व चमकणारे कीटक यांचीही माहिती देण्यात आली आहे.