प्रा. धनंजय दळवी
४ फेब्रुवारी,१७६८ रोजी ब्रिटिश सरकारने ‘जंगी पलटण’ म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा (एम. एल. आय. आर.) शुभारंभ करून स्थापना केली होती. पूर्वी ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री’ अशी ओळख या रेजिमेंटला होती. सन १८०२ मध्ये या ‘जंगी पलटण’ला रेजिमेंटचा दर्जा सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. भारतीय सेनेतील सैन्यदल म्हणून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक असणाऱ्या या रेजीमेन्टला २५७ वर्षाचा प्रदीर्घ इतिहास आहे. या रेजिमेंटचा प्रारंभ ६ बटालियन एकत्रित करून करण्यात आला होता. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगाव, कर्नाटक येथे आहे. मराठा लाईट इन्फंट्री मधील सैनिकांना प्रेमाने ‘गणपत’ असेही संबोधतात. ४ फेब्रुवारी, १७६० या दिवशी तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या अद्वितीय पराक्रमाने कोंढाणा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता. मराठ्यांनी कोंढाणा किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेला आज ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठा रेजिमेंटचे *”कर्तव्य-सन्मान-धैर्य”* हे ब्रीदवाक्य आहे. या रेजिमेंटचे चिन्ह अशोक चक्र सोबत ढाल-तलवार आणि तुतारी हे आहे. पोशाख हिरवी बेरेट आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीची युद्ध घोषणा *”बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!”* ही आहे. यामागेही मोठा इतिहास आहे. ब्रिटिशांकडून इटालियन सैनिकांच्या ताब्यात असलेला ‘डोलोगोरोडॉक’ हा सध्याच्या इथियोपिया देशात असलेला किल्ला ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिशांच्या परवानगीने सुभेदार श्रीरंग लावंड यांनी ही प्रथम शिवगर्जना करून एका दिवसात हा किल्ला ताब्यात घेतला होता. यामुळेच सन १९४१ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीची ही युद्धगर्जना ब्रिटिशांनी अधिकृत केली. ही एकमेव युद्धगर्जना देशाच्या…. देवाच्या नावाने नसून, एका राजाच्या…. ज्याचे भारतीय इतिहासात अजरामर व अढळ स्थान आहे अशा एका महापुरुषाच्या नावाने आहे. याचबरोबर संघर्षमय परिस्थितीमध्ये सैनिकांना *’हर हर महादेव…’* आणि *’जय भवानी…. जय शिवाजी’* या गर्जनेतून स्वयंप्रेरणा मिळते.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठा लाईट इन्फंट्री च्या बटालियनने सर्वच महत्वपूर्ण भारतीय सशस्त्र संघर्षात भाग घेतला आणि चोख कामगिरी बजावली आहे. यामध्ये १९४७ मधील भारत पाकिस्तानमधील संघर्षजन्य परिस्थिती, जुनागड व हैद्राबादचे विलीनीकरण, गोव्याचे सामीलीकरण, १९६५ आणि १९७१ मधील भारत पाकिस्तान युद्ध, १९५६ मधील चीन विरुद्धचा संघर्ष, १९९९ मधील कारगिल युद्ध, ऑपरेशन पवन, सियाचीन ग्लेशियरमधील नियमित ऑपरेशन्स, तसेच देशांतर्गत व देशाबाहेरी बंडखोरी कारवायामध्ये नियमित सहभाग घेऊन उत्तम यश प्राप्त केले आहे. भारतीय सैन्याच्या विस्तारामुळे रेजिमेंटची संख्या १८ नियमित बटालियन व दोन प्रादेशिक बटालियनमध्ये वाढली आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांच्या क्विक मार्चचा वेग एका मिनिटात १४० पावलांचा असतो, तर क्विक मार्च चा मानक वेग ३० इंचाच्या स्टेप्ससह १२० बिट्स प्रति मिनिट असतो. रेजिमेंटने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येमध्ये दोन वेळा सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडीचा सन्मान प्राप्त केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक मराठा सैनिकांनी मानाचा ओ. बी. आय. पुरस्कारासह व्हिक्टोरिया क्रॉस सन्माननीय प्राप्त केला आहे. २५७ वर्ष पूर्ण करणाऱ्या रेजिमेंटने आज पर्यंत १,१५७ विविध प्रकारची शौर्य पदके व पुरस्कार प्राप्त केले आहेत. या विविध शौर्य पुरस्कारांमध्ये ५ अशोक चक्र, २ पद्मभूषण, ३३ परमविशिष्ट सेवा मेडल, ५ महावीर चक्र, १६ किर्ती चक्र, २ पद्मश्री, ४ उत्तम सेवा मेडल, ३९ अतिविशिष्ट सेवा मेडल, ४४ वीर चक्र, ६५ शौर्य चक्र, १४ युद्ध सेवा मेडल, ४३५ सेना मेडल, २ जीवन रक्षा पदक, १ अर्जुन अवॉर्ड, ३ डी.सी.एस. कमेंडेशन अवॉर्ड असे एकूण ६७० पदके व पुरस्कार, तसेच चीफ आर्मी ऑफ स्टाफ कमेंडेशन कार्ड, जी. ओ. सी. एन. सी. कमेंडेशन कार्ड यामध्ये एकूण ४८७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मराठा लाईट इन्फंट्रीची शान अनेक जवान व अधिकाऱ्यांनी वाढवली. ज्या अधिकाऱ्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीसाठी उत्तम कामगिरी करून भारतीय सैन्यदलाचा नावलौकिकही वाढवला. या मराठा रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांमध्ये जनरल जोगिंदर जसवंत सिंग, तत्कालीन लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय, लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार, लेफ्टनंट जनरल कृष्णमूर्ती नागराज, लेफ्टनंट जनरल हरी प्रसाद, लेफ्टनंट जनरल एम. ए. झाकी, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल सतीश नांबियार, लेफ्टनंट जनरल नरेंद्र सिंग, लेफ्टनंट जनरल डी. एस. ठाकूर, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग, लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे, लेफ्टनंट जनरल सतीश सातपुते, लेफ्टनंट जनरल पी. आर. गंगाधरन, लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग, लेफ्टनंट जनरल जे. एस. धिल्लन, लेफ्टनंट जनरल परमिंदरजीत सिंग पन्नू, लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री, लेफ्टनंट जनरल टी. पी. एस ब्रार, लेफ्टनंट जनरल गोपाल कृष्ण दुग्गल, मेजर जनरल डी. एस. ब्रार, मेजर जनरल युस्टेस डिसोझा, मेजर जनरल एच. डब्ल्यू. कुलकर्णी, मेजर जनरल बचितर सिंग, ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत, कॅप्टन सी. पी. कृष्णन नायर यांचा समावेश आहे. मराठा लाईट इन्फंट्रीच्या स्थापनेपासूनचा शौर्य आणि सेवेचा वारसा उत्तम प्रकारे अजूनही जपला जात आहे. युद्धजन्य परिस्थिती व शांतता यामध्ये रेजिमेंटने आपली अतूट बांधिलकी कायम राखली आहे. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय असणाऱ्या बेळगाव, कर्नाटक येथील म्युझियममध्ये मराठा रेजिमेंटच्या इतिहासाची माहिती, ऊर्जा कलाकृती, छायाचित्रे व कागदपत्रे उत्तम प्रकारे जतन केलेली आहेत. मराठी रेजिमेंटच्या या म्युझियमला सर्व भारतीय नागरिकांनी एकदा तरी भेट देऊन मराठा इन्फंट्रीचा इतिहास आणि वर्तमान जाणून घ्यायला हवा.