मुरुड : मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 2 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरटयांनी दहा घरांवर दरोडा टाकला. घरांचे लॉक तोडून घराच्या आतील ऐवज लंपास केला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सदर घरातील लोक मुंबई येथे वास्तव्यास असल्याने यातील बहुतेक घरे बंद होती. अज्ञात चोरटयांनी या संधीचा फायदा उठवत भोगेश्वर पाखाडीमधील दहा घरांचे लॉक तोडले आहेत. घरातील मालक वर्ग अद्यापर्यंत न आल्याने घरातून काय चोरीला गेले याचा तपशील कळू शकला नाही.
मुरुड पोलिसांनी घटना स्थळाला भेट देऊन घटना ठिकाणी पाहणी केली आहे. तातडीने फिंगर प्रिंट्स विभागास सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. घराला असणारे लॉक, कडी कोयडा तोडले.अचानक पणे असा प्रकार घडल्याने येथील सर्व नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. मुरुड पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कोणीही तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस तपास करीत आहेत. प्रत्यक्ष घराचे मालक आल्यावरच किती रक्कमेचा ऐवज गायब झाला आहे ते कळणार आहे. एकाच पाखाडीमध्ये दहा घरांचे लॉक तोडण्याची घटना प्रथमच घडल्याने मुरुड शहरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.