राजापूर : विकसित भारताचे स्वप्न युवा पिढीच घडवू शकते, शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन जीवन हेच आदर्श नागरिक घडविण्याचा पहिला टप्पा आहे. आयुष्यात सकारात्मक विचारांचा अंगिकार केल्यास जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले.
राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, सचिव मजिद पन्हळेकर, शाळा समिती अध्यक्ष व संस्थेचे सहसचिव अ. सलाम खतीब, प्राचार्य राजेंद्र व्हनमाने, नॅशनल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शकिल मोकाशी, अश्रफ काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात तिलावते कुरआने पाके कु. माविया शेख या विद्यार्थ्यांने केली. त्यानंतर डॉ. जॅसमिन यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.जॅसमिन यांनी या वेळी सांगितले की, यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध दिनचर्या खूप महत्वाची आहे. व्यक्तीचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अभ्यासाबरोबरच अभ्यासेत्तर उपक्रम, विविध स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग, पुस्तकांचे वाचन, सोशल मीडियाचा गरजेनुसार वापर, याबाबत कटाक्ष असला पाहिजे. शिक्षणाचा समाजासाठी फायदा झाला पाहिजे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाददेखिल साधला.
प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशी स्पर्धा करावी, संस्कारक्षम घेतलेल्या शिक्षणामुळे तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्था सहसचिव अ. सलाम खतीब यांनीदेखिल विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. त्यानंतर वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. जॅसमिन, तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक पालक संघाच्या सदस्या फहमीदा हाजू, सना खलिफे, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी कु. कफिल रिझावी, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. श्रावणी वेलणकर, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती अक्षया घाटे, पारितोषिक वाचन प्रा. श्रीमती ज्ञानदा असोलकर व प्रा. श्रीमती सुनिता कोकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती स्मिता तेली यांनी, तर आभार प्रा. श्रीमती प्रितम सुर्वे यांनी मानले.