आवश्यक सोलर पॅनलसाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची घोषणा ३१ शाळांना डिजिटल साहित्य वाटप
सिंधुदूर्ग:-विद्यार्थ्यांना रोजगार मुख आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे.यासाठी कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सोलर पॅनल देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी डिजिटल साहित्य वाटप कार्यक्रमात दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यालय येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शाळांना डिजिटल साहित्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार निरंजन डावखरे यांच्या २०२४ -२५च्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३१ शाळांना आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते डिजिटल साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले, कोकणातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा आपला मानस असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २१० शाळा डिजिटल झाल्या आहेत . गेल्या वर्षी ५० शाळा डिजिटल करण्यात आल्या तर यावर्षी आतापर्यंत ३१ शाळांना साहित्य पुरविण्यात आले आहे. यापुढे सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. शाळांना संगणक, प्रोजेक्टर यासह आवश्यक साहित्य पुरविण्यात येत असले तरी त्यांची देखभाल आणि विजेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा नियोजन मधून सोलर पॅनल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या वेळीच जिल्ह्यातील आणि कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा मानस असल्याचे आपल्याला बोलून दाखविले होते. त्यानुसार त्यांनी निवडून आल्यानंतरही आपले लक्ष कायम ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना, जे डिजिटल साहित्य पुरविले जाते ते सुस्थितीत राहावे यासाठी तसेच शाळांना वीज बिलाचा प्रश्न निर्माण होतो तो सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन च्या नवीन आराखड्यात सोलर पॅनल साठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथील शाळांतील मुलांचा पट वाढावा यासाठी शिक्षकांनी आणि संबंधितांनी नवनवीन उपक्रम राबवावे. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.