हायकोर्टाच्या निवडणूक आयोग नोटीसीचे स्वागत
मुंबई:-विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यावर घेतलेल्या आक्षेपनंतर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले की, विधानसभेचा निकाल हाच कळीचा मुद्दा आहे. निकाल लागल्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जाणकार हाच प्रश्न विचारत आहे की, शेवटच्या तासा-दोन तासात मतदान कसं वाढलं. वाढलेलं मतदान हाच मोठा घोटाळा आहे. आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार गेलो, मात्र आम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगही देऊ शकलेलं नाही. निवडणूक आयोग एकच म्हणतं की, ऐसा हो सकता है… याचा अर्थ काय… 76 लाख मतं वाढतात कशी… आणि 76 लाख मतांची 150 मतदारसंघात विभागणी केली तर, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत. प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली. याशिवाय, या घोळातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकलं. हे सरकार सरळ मार्गानं आलेलं नाही. यामागे खूप मोठी पटकथा असून अनेक खलनायकांनी त्यात काम केलं आहे. उच्च न्यायालयानं विचारलेला प्रश्न हा जनता पण विचारत आहे. आम्हाला आमची लोकं सांगतात की, नाशिकमध्ये जे जिंकले त्यांनी विजय मिरवणूक काढली नाही. कारण त्यांना खात्रीच नाही की, आपण जिंकलो. तसेच, इतक्या लाखांच्या मतांनी आम्ही जिंकलो.