रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या व जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला करीत जखमी केले. साहिल अजमल कालसेकर (३५) असे या संशयिताचे नाव आहे.
तुरुंग अधिकारी जगदिश ढुमणे यांच्या फिर्यादीनुसार, साहिल हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सहाच्या सुमारास कारागृहातील मंडळल कार्यालयात साहिल यास गैरवर्तन न करण्याबाबत समजूत काढत होते. त्यावेळी साहिलने ‘मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करील’ माझे डोक आपटून घेईल अशा धमकी देत साहिलने टेबलवरील काठी उचलून ढुमणे यांना मारली. तसेच त्यांना मारहाण करीत दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात साहिल विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल सराईत गुन्हेगार
सुत्रांच्या माहितीनुसार, साहिल विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, चिपळून, सावर्डे, संगमेश्वर, देवरुख, पोलादपूर, महाड पोलिस ठाण्यांमध्ये २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, चोरी, पोलिसांच्या अंगावर वाहने घालणे, स्वत:स दुखापत करून पोलिसांवर आरोप करणे, न्यायालयात कागदपत्रे फाडणे, न्यायाधीशांवर चप्पल भिरकावणे, पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे, अमरावती मध्यवर्ती कारागृहातून जून २०२२ मध्ये इतर दोन कैद्यांसह साहिलने पळ काढला होता. त्याच्या वर्तवणूकीमुळे त्यास ऱत्नागिरी, नागपूर, अमरावती कारागृहांमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहेत.