नागरिकांनी पाठलाग करुन रोखला टँकर
चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावर रसायनवाहू टँकरला गळती लागून सांडलेल्या रसायनामुळे परशुराम घाटात चार पाच दुचाकीस्वार घसरुन पडल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. यानंतर संतप्त वाहनचालकांनी या टँकरचा पाठलाग करुन तो सवतसडा धबधबा परिसरात थांबवत त्याची माहिती पोलीस ठाणेत दिली. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. या घटनेत चार दुचाकीस्वार जखमी झाले.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातून रसायन भरलेला टँकर चिपळूणच्या दिशेने येत असताना परशुराम घाटात या टँकरला अचानकपणे गळती लागली. त्यातून चिकट स्वरुपाचे रसायन महामार्गावर सांडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी या टँकरच्या मागून येत असलेले दुचाकीस्वार या रसायनावरून घसरून पडू लागले. एकापाठोपाठ घडलेल्या अपघातात तीन-चार दुचाकीस्वार जखमी झाले. अखेर सुरक्षितेतच्यादृष्टीने शिवाय पुढील अपघात रोखण्यासाठी काही वाहनचालकांनी त्या टँकरचा पाठलाग सुरु केला. तोपर्यंत हा टँकर परशुराम बस थांब्यापासून पुढे सवतसडा धबधब्यापर्यंत आला होता. सवतसडा धबधबा येथे टँकर थांबवल्यानंतर संतप्त वाहनालकांनी थेट टँकर चालकावर हल्लाबोल चढवला. त्याला चांगलेच फैलावर घेत तीव्र संताप व्यक्त केला.
यानंतर त्या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली. ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी त्या टँकर चालकाला ताब्यात त्याची चौकशी सुरू केली. या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नानंतर ही वाहतूककोंडी सोडवण्यात आली. या प्रकारामुळे लोटे औद्योागिक क्षेत्रातून रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचा गलथान कारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे. रसायन वाहतूक करत असताना त्याची विशेष अशी खबरदारी टँकर चालक घेत नसल्याने यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा टँकर चालकावर वचक बसण्यासाठी पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे मात्र लक्ष लागून राहिले आहे.