पाठयपुस्तकांसह मुलांना वह्याही घेऊन जाव्या लागणार, पालकांना पुस्तक खरेदी खर्च वाढणार
रत्नागिरी:-नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. पुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट करण्यात येणार नसून मुलांना स्वतंत्र वह्या रोजच्या दप्तरातून शाळेत घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे परत एकदा पालकांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. नुकताच तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षात वहयाची पाने समाविष्ट करून पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. या योजनेचा उद्देश दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तकांसह सोबत वह्यादेखील घेऊन येत होते. ही बाब लक्षात घेता, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणेच नियमित पाठयपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत. यात वह्याच्या पानांचा समावेश असणार नाही.
शिक्षण व शैक्षणिक साहित्याचे सार्वत्रिकरण होणे, पाठयपुस्तक व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबत राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या मुलांना शाळेत जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्यांचा विचार करुन गत शैक्षणिकपासून इयत्ता 2 री ते 8वीच्या पाठयपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय शासनाने मागे घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शासनाने 100 टक्के विद्यार्थ्यांना नवीन पाठयपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका वितरीत कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.