चुकीची औषधे दिल्याने मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप
रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वरवणे या ठिकाणी असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी मुलीचा मृत्यू झाला आहे. खुशबू नामदेव ठोंबरे असे मृत विद्यार्थी नीचे नाव असून या मुलीला पूर्वी कोणताही आजार नसताना आरोग्य विभागाच्या कुसुम योजने अंतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मध्ये तिला कुष्ठरोगी ठरवण्यात आले होते. त्याबाबत आरोग्य विभाग व आश्रम शाळेने मुलींच्या पालकांना कळवले नाही. यादरम्यान मुलीला चुकीची औषधे दिल्याने आपल्या मुलीचे हात पाय सुजले, अंगावर फोड्या आल्या तसेच ती अस्वस्थ होऊन तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूला शासकीय आदिवासी आश्रम शाळा त्याचबरोबर आरोग्य विभाग जबाबदार असून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुलीचे पालक नामदेव ठोंबरे यांनी केली आहे.
पेण (जि. रायगड) तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तांबडी आदिवासी वाडी आहे या वाडीवर असलेल्या रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान खुशबू ठोंबरे हिला कुष्ठरोग असल्याचे निदान झाल्यानंतर याची माहिती पालकांना देणे आवश्यक असताना प्रार्थमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय आश्रम शाळा व्यवस्थापकांकडून कोणत्याही स्वरूपाची माहिती मृत खुशबू हिच्या पालकांना देण्यात आली नाही. तिला कुष्ठरोग निर्मूलन उपचाराकरता संबंधित गोळ्या १८ डिसेंबर पासून सुरू करण्यात आल्या त्यानंतर २८ डिसेंबर पर्यंत मुलीच्या वडिलांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हिची मोठी बहीण त्याच शाळेमध्ये शिकते आणि ती सहलीसाठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी नामदेव ठोंबरे आश्रम शाळेत आल्यानंतर खुशबू आजारी असल्याचे त्यांना समजले.
नामदेव ठोंबरे यांनी आपल्या मुलीला घरी आणले, शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या ते तिला देत होते परंतु या गोळ्या कसल्या आहेत याची कल्पना नामदेव ठोंबरे यांना नव्हती. ३ जानेवारी रोजी ठोंबरे यांनी आपल्या मुलीला पुन्हा आश्रम शाळेत येऊन सोडले. त्यानंतर मुलीची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुष्ठरोगासाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या त्वरित बंद करण्यास सांगितले. १६ जानेवारीपासून तिच्यावर उपचार केले जात असताना २२ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. माझ्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनचे होते, ते कुष्ठरोगाचे नव्हते त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानात माझ्या निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. आमच्या मुलीच्या प्रकृतीमध्ये बदल होऊन अंगावर सूज आली ,ही चुकीच्या उपचारामुळे आली होती माझ्या मुलीला कुष्ठरोग ठरवण्यात आले होते. हे मुख्याध्यापक किंवा अधीक्षक यांनी सांगितले नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूला आश्रम शाळा मुख्याध्यापक, अधीक्षक जबाबदार आहेत असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.