देवरुख / प्रतिनिधी :- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एच. एस. सी.(इयत्ता १२वी)च्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय व देवरुख परिसरात आयोजित जनजागृती फेरीत कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या जनजागृती फेरीला संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी गैरमार्ग मुक्त परीक्षा अभियानाचे महत्त्व तसेच हे अभियान राबविण्याची आवश्यकता याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जनजागृती फेरीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना(+2 स्तर) विभागामार्फत करण्यात आले होते.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित आणि आनंददायी वातावरणात कशाप्रकारे सामोरे जावे, परीक्षेचे पेपर लिहिताना कोणती विशेष दक्षता घ्यावी, परीक्षा कालावधीतील आहार व आरोग्याबाबत कशी आणि कोणती काळजी घ्यावी, परीक्षेचे नियोजन व वेळेचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. संचिता चाळके, प्रा. धनंजय दळवी आणि प्रा. विजय मुंडेकर यांचा समावेश होता.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रतिज्ञा घेतली. यानंतर महाविद्यालयातून जनजागृती फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवरुख बाजारपेठ, एस. टी. स्टँड, मातृ मंदिर चौक ते परत महाविद्यालय अशा मार्गाने काढण्यात आली. यानिमित्ताने नागरिकांना देखील कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा अभियानाविषयी जागरूक करण्यात आले. जनजागृती फेरीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. प्रवीण जोशी, प्रा. मयुरेश राणे आणि प्रा. अभिनय पातेरे यांनी मेहनत घेतली.